Blogger Widgets Karmveer: September 2018
तंत्रज्ञानाची कास धरू या,कर्मवीरांचा वसा पेलू या !

Friday, 21 September 2018

“ पद्मभूषण कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील - एक निष्काम कर्मयोगी”





      अस म्हटलं जातं की, देवाला बोलता येत नाही, पण जेव्हा त्याला या पृथ्वीतलावरील दुःखीत, पिडीत, वंचित, दीन, दुबळे यांच दुःख बघून जेव्हा देवाला बोलावस वाटत, तेव्हा देव या सृष्टीतलवार मनुष्यरूपात जन्म घेतो आणि मग त्याच या सृष्टीतलवार वावरणं, त्याचा उपदेश, त्याचा वंचितांसाठीचा कैवार, त्याचा आचार, त्याचे विचार यातून जणू काही परमेश्वरच बोलत असतो आणि हाच मनुष्य मग देवदूत म्हटला जातो आणि अशाच युगपुरुषाला येणाऱ्या पिढया देवाचं रूप म्हणुन आजन्म पूजतात, असाच एक देवदूत या सृष्टीतलवार होऊन गेला नाव त्यांचं पद्मश्री डॉ.भाऊराव पायगोंडा पाटील. प्रेमाने लोक त्यांना अण्णा म्हणत तर सन्मानाने कर्मवीर म्हणत. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावी पिता पायगोंडा पाटील व आई गंगूबाईंच्या उदरी 22 सप्टेंबर 1887 या दिवशी त्यांचा  जन्म झाला.        अण्णांचे बालपण इतर सर्वसामान्य मुलांसारखे जरी असले तरी एक विलक्षण फरक असा होता, तो म्हणजे सनातनी व अन्याय व्यवस्थेविरोधातील विद्रोही स्वभाव. लहानपणीचा एक प्रसंग असा की, एक सार्वजनिक पाणवठ्याच्या विहिरीवर वंचितांना पाणी भरण्यास  मज्जाव केला जात असल्याच दृश्य त्यांनी पाहताच त्यांनी तिथेच त्या प्रथेला विरोध केला आणि सरळ त्या विहिरीच्या रहाटाला लाथ मारून तो रहाट मोडला. त्यावेळी अण्णांनी रहाटावर मारलेली लाथ ही फक्त त्या रहाटावर नव्हती तर तात्कालिक अन्याय जातीव्यवस्थेच्या छाताडावर मारलेली लाथ होती यातूनच कर्मवीरांच्या बालपणीच त्यांच्या निग्रही, दृढनिश्चयी, वैचारिक अधिष्ठान असलेला व विद्रोही स्वभावाची पायाभरणी झालेली दिसून येते.
      अण्णांच्या आयुष्यातील एक महत्वाची बाब म्हणजे, अण्णांचा लक्ष्मीबाईंसोबतचा विवाह, कारण त्यांना पत्नी म्हणून ज्या लाभल्यात त्या फक्त एक गृहिणी म्हणून नव्हे तर उभ्या महाराष्ट्रात ज्यांचं नाव आज आदराने घेतलं जात अस लोकोत्तर कार्य त्यांनी अण्णांच्या सोबत केलं अशा लक्ष्मीबाई अण्णांना पत्नी म्हणून लाभल्या हा सुद्धा दैवी योगच. कर्मवीरांच्या तरुण्यातला असाच एक प्रसंग जेव्हा अण्णा विवाहीत होते व एकदा घरी पाहुणे आलेले होते, जेवणाला पंक्तीत कुटुंबातील सदस्य व पाहुणे बसले असताना सहज पाहुण्यांनी प्रश्न केला की, तुमचा मुलगा भाऊ काय करतो? तेव्हा अण्णांचे वडील म्हटले, काही नाही खातो आणि फिरतो. त्याक्षणी नेमक्या लक्ष्मीबाई अण्णांना कालवण वाढीत होत्या. ते शब्द लक्ष्मीबाईंनी ऐकताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले, अण्णांनी ते पाहिलं अण्णांना देखील स्वाभिमानाला आघात बसल्याची जाणीव झाली आणि तडक तिथून उठून घर सोडले. त्याचक्षणी खऱ्या अर्थाने एक देवदूत समाजकार्यास घराबाहेर पडला. शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी एक युगप्रवर्तक नव्या वाटेने निघाला. याच प्रवासात पुढे अण्णांनी साताऱ्याला शिकवणीचे वर्ग सुरू केले. त्याच बरोबर ते लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या कारखान्यात प्रचारक म्हणून काम करीत असताना गावोगावी भ्रमंती करत होते. ह्यातूनच कर्मवीरांच्या लक्षात आले की, आपला देशाची संस्कृती इतकी महान, आपला इतिहास इतका पराक्रमी तरी देखील आपण असे अज्ञान, मागास, दारिद्रय तर पाचवीलाच पुजलेले कसे ? आणि मग त्यांच्या या विचार प्रक्रियेतून त्यांना असे लक्षात आले की, या महाराष्ट्रातील जनतेच्या दारिद्र्याचे मूळ हे त्यांच्या अज्ञानात आहे आणि याच प्रक्रियेतून पुढे दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली. 4 ऑक्टोंबर  1919 रोजी काले जि. सातारा येथे विजयादशमीच्या मुहूर्तावर रयत शिक्षण संस्थेची स्थापनेची घोषणा केली, आणि शेतकऱ्यांच्या ,कष्टकऱ्यांच्या पोराबाळांसाठी ज्ञानाची कवाड खुली करण्याचा मार्ग निर्माण केला. जिद्द, कष्ट करण्याची वृत्ती, स्वाभिमान  अशा अण्णांच्या अंगीभूत  गुणांमुळेच उभ्या महाराष्ट्रभर रयत शिक्षण संस्था ज्ञानदानच कार्य करू लागली. आजही तो ज्ञानयज्ञ अविरतपणे अखंड तेवत आहे.
     अण्णांचे विद्यार्थी, शिक्षण , समाज यावर देखील अतिशय स्पष्ठ व आजच्या या काळात देखील मार्गदर्शक ठरतील असे मौलिक विचार होते. विद्यार्थ्यांबद्दल अण्णा नेहेमी म्हणत की, रयतेचा विद्यार्थी हा शिस्त प्रिय असला पाहिजे, पाण्याचा धबधबा आणि आग यावर जर नियंत्रण मिळवता आलं नाही तर त्याचा आपण उपयोग करू शकत नाही. तसेच विद्यार्थीदशेत जर विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त नसेल त्याच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी परिणामकारकपणे होणार नाही. त्यांच्या मते, विद्यार्थी दशेत जर विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त बाणली गेली नाही तर त्यांच्या शिक्षणावर केलेला खर्च केलेला पैसा व वेळ व्यर्थ झाला असे समजावा. रयतेचा विद्यार्थी हा "मोडेन पण वाकणार नाही" ह्या ब्रीदवाक्या प्रमाणे असावा. न्यायाची चाड, अन्यायाची चीड व त्याविरुद्ध बंड करून उठणारा असावा, असे ते नेहेमी म्हणत असत. शिक्षणाबद्दल ते म्हणत की, शिक्षणाने माणूस बहुश्रुत व विवेकी बनतो, शिक्षण हे व्यक्तीच्या विकासाचे मूळ आहे. कर्मवीरांनी "स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" असे  संस्थेचे ब्रीदवाक्य जेव्हा निश्चित केले त्याचसमयी स्वावलंबी जीवनाचा मूलमंत्र दिला गेला. विद्यार्थ्यांना वर्गात जे शिकवलं जातं असताना पुस्त्ली ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे तर त्यातून त्यांना जो उपदेश दिला जातो ते खरे शिक्षण अस ते म्हणत असत. गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, आपल्या स्वत्वावरील  बंधने, दडपणे, दूर करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही असं सांगत ते शिक्षणाचे महत्व मांडत असत. समाजाबद्दल अण्णा नेहेमी म्हणत की, समाजामध्ये व्यक्तीला ज्या आधारे प्रतिष्ठा बहाल केली जाते त्याचा क्रम हा उलट असला पाहिजे. आयुष्यभर कधीही आपल्या हातानी काबाडकष्ट न करणारा हा इतरांच्या कष्टावर प्रतिष्ठित मानला जातो. पण तासनतास शेतीत कष्ट करणारा राबराब राबणारा शेतकरी, कष्टकरी जो इतरांच्या पोटापाण्याची देखील काळजी घेतो त्याला समाजात काहीही किंमत मिळत नसते. म्हणून श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.
      ते नेहेमी म्हणत की,"ज्योतीरावांनी मला समाज सुधारणेचा कानमंत्र दिला, विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाची आणि शिक्षणाची दिक्षा दिली, छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या स्फूर्तीवर माझा बंडखोरीचा पिंड पोसला गेला आणि महात्मा गांधींच्या सत्य अहिंसेच्या विचाराने मी राष्ट्रीय कार्याकडे वळलो." अशा महान समाज धुरिणांच्या विचारांचा अण्णांवर पगडा होता. गौतम बुद्धांच्या "बहुजन हिताय बहुजन सुखाय" या शिकवणीचा देखिल अण्णांवर प्रभाव होता. बुद्धांना ज्ञानप्राप्ती वडाच्या वृक्षाखाली झाली म्हणून बोधिवृक्ष म्हणून गणल्या गेलेल्या त्याच वृक्षाचा अण्णांनी संस्थेचे बोधचिन्ह म्हणून स्विकार केला. अशा लोकोत्तर युगपुरुषाचा कार्य सन्मान म्हणून भारत सरकारने त्यांना 20 जानेवारी 1959 रोजी "पदमभूषण" हा राष्ट्रीय सन्मान दिला. त्यांनतर 4 एप्रिल 1959 रोजी पुणे विद्यापीठाने त्यांच्या कार्याचे व्यापक स्वरूप पाहून त्यांना "डी लीट" ही पदवी बहाल केली. यानंतर 9 मे 1959 रोजी एका अल्पशा आजाराने अण्णा इहलोकी गेले. एक निरंतर कर्मयोगी देहाने जरी ह्या भुमीतून अंतर्धान पावले पण विचाराने मात्र पिढ्यांपिढ्या अमर झाले. एक क्रांतीसूर्य अस्ताला गेला पण त्यापूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीला ज्ञानसाधनेने प्रकाशित करून गेला. अशा या युगपुरुषाच्या या महिण्यातील 22 सप्टेंबर या जन्मदिनी मी त्रिवार अभिवादन करतो. धन्यवाद...!

-श्री.पगार प्रशांत बाजीराव (मो.८३२९३६५०३२)
न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी ता.निफाड जि.नाशिक